
अकोला
अकोला विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, विमानतळासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अकोला विमानतळाच्या विकासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अकोला येथून छोट्या विमानांची सेवा सुरू करता येईल का, याबाबत चाचपणी आणि पाठपुरावा खासदार अनुप धोत्रे यांच्याकडून सातत्याने सुरू आहे. यासाठी केंद्र सरकार तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याकडेही विविध स्तरांवर पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अकोल्याच्या विकासाला केंद्रबिंदू मानून विविध विकासकामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी म्हटले आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या माध्यमातूनही विकासकामांसाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अकोला विमानतळाच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणे आणि जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होणे या बाबी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. आगामी काळात या प्रक्रियेला गती मिळाल्यास अकोलावासीयांना हवाई सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होऊ शकतो.
“लवकरच अकोलाकरांना हवाई सेवा उपलब्ध होईल,” असा विश्वास खासदार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.








