सांगवी (आष्टी) | प्रतिनिधी
सांगवी (आष्टी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील कंपाऊंड वॉलच्या कामाबाबत नागरिकांकडून गंभीर तक्रार करण्यात आली आहे. संबंधित काम प्रत्यक्षात पूर्ण झाले नसतानाही त्याचे देयक अदा करून शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
या प्रकरणी ग्रामस्थ व संबंधित नागरिकांनी आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन साद केले. निवेदनात शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाची सद्यस्थिती, मंजूर निधी, देयकाची माहिती आणि प्रत्यक्ष करण्यात आलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित कामाची तांत्रिक व प्रशासकीय पातळीवर योग्य तपासणी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.
दरम्यान, शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपाऊंड वॉल महत्त्वाची असल्याने हे काम तातडीने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी निवेदन देताना ग्रामस्थ व संबंधित नागरिक उपस्थित होते. आता पंचायत समिती प्रशासनाकडून या तक्रारीची प्रत्यक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणली जाणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
