विभागीय प्रतिनिधी
भडगाव :
तालुक्यातील कजगाव येथील विद्युत उपकेंद्राला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत सुमारे ४ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत उपकेंद्रातील साहित्याची तोडफोड करून चोरट्यांनी विविध वस्तूंचे नुकसान केले. यामध्ये कॉपर कॉइल तसेच सुमारे ३ हजार लिटर ट्रान्सफॉर्मर ऑईल चोरीस गेले आहे. चोरीला गेलेल्या साहित्याची अंदाजे किंमत ४ लाख ६० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही चोरी २२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून २३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चोरट्यांनी उपकेंद्रातील काही उपकरणे व साहित्य तोडून त्यातील मौल्यवान भाग काढून नेला.
चोरीमुळे विद्युत उपकेंद्राचे नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. निखिल नारायणजी झाडे (वय ३९) यांनी भडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल किशोर सोनवणे करीत आहेत.







