तेल्हारा प्रतिनिधी/
पिवंदळ बु. परिसरातील शेतशिवारात स़ोयाबीन कापूस पिकावर मावा आणि तुडतुड्यांमुळे शेतकरी चिंतेत आहेत.
परिसरात पिकांवर मावा आणि तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. बदलत्या हवामानामुळे आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे या किडींचा फैलाव झपाट्याने होत असून, पिकांचे उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलांमुळे पिकांवर विविध रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने मावा आणि तुडतुडे या रस शोषणाऱ्या किडींनी पिकांना लक्ष्य केले आहे.
या किडी पिकांच्या कोवळ्या पानांतून आणि खोडातून रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडणे, सुकणे आणि गुंडाळली जाणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. रस शोषल्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, उत्पादनात मोठी घट येण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
कृषी विभागाने तातडीने पिकांची पाहणी करून मार्गदर्शन व मदत करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.











