पुणे जिल्हा प्रतीनिधी: अविनाश घोगरे
शिरूर, शिरूर साबुदाणा वड्यासोबत देण्यात आलेल्या चटणीत अळी आढळल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शिरूर शहरातील बसस्थानकाजवळील हॉटेल विसावा ची तपासणी केली. यापूर्वी अन्नपदार्थांची हाताळणी, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेशी संबंधित त्रुटी आढळल्याने हॉटेलला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावून त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर करण्यात आलेल्या पुनर्तपासणीत किचनमध्ये झुरळांचा वावर तसेच गंभीर स्वच्छता व अन्नसुरक्षेच्या त्रुटी आढळून आल्याने एफडीएने हॉटेलचा परवाना तत्काळ निलंबित केला.
सोमवारी (ता. ३१) हॉटेल विसावा येथे नाश्ता करण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाला साबुदाणा वड्यासोबत देण्यात आलेल्या चटणीत अळी आढळून आली. याबाबत ग्राहकाने हॉटेल चालकाकडे जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्राहकाने अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केली.
दरम्यान, चटणीत अळी आढळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर या प्रकाराची शहरात मोठी चर्चा झाली. तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलची तपासणी केली. या तपासणीत अन्नपदार्थांची हाताळणी, स्वच्छता तसेच अन्नसुरक्षेशी संबंधित विविध त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे हॉटेलला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश हॉटेल व्यवस्थापनाला देण्यात आले होते.
मात्र, त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने एफडीएकडून हॉटेलची पुनर्तपासणी करण्यात आली. या वेळी हॉटेलच्या किचनमध्ये झुरळांचा वावर आढळून आला. त्याचबरोबर स्वच्छता व अन्नसुरक्षेशी संबंधित गंभीर त्रुटीही निदर्शनास आल्या. त्यामुळे हॉटेलमध्ये अन्नसुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे अपेक्षित पालन होत नसल्याचे स्पष्ट झाल्याने एफडीएने हॉटेलचा परवाना तत्काळ निलंबित केला.
हॉटेल व्यावसायिकांना एफडीएचा इशारा हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. हॉटेलच्या किचनमध्ये नियमित स्वच्छता राखणे, कामगारांची वैद्यकीय तपासणी करणे, पेस्ट कंट्रोल करणे तसेच ग्राहकांना ताजे व सकस अन्नपदार्थ पुरविणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार असल्यास ग्राहकांनी ती अन्न व औषध प्रशासन विभागाकडे नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
— विश्वजीत शिंदे,
सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे










