कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ३ ते १७ सप्टेंबरपर्यंत विविध कृत्यांवर निर्बंध
त्रिवेणी न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी : सुगत उराडे
गडचिरोली, दि. ५ सप्टेंबर २०२६
गडचिरोली जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला-दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा आणि गणेशोत्सव अशा विविध सण-उत्सवांची लगबग सुरू झाली आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ३ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ वाजेपासून ते १७ सप्टेंबर २०२६ रोजी २४.०० वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) लागू करण्यात आले आहे. जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
शस्त्र बाळगण्यास मनाई
या कालावधीत कोणत्याही व्यक्तीने शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच दाहक अथवा स्फोटक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रे किंवा ती फेकण्यासाठी वापरता येणारी उपकरणे अथवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यावरही प्रतिबंध घालण्यात आला आहे.
आक्षेपार्ह घोषणा, भाषणे व प्रदर्शनावरही निर्बंध
सार्वजनिक ठिकाणी सभ्यता किंवा नीतिमत्तेला धक्का पोहोचेल, राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल किंवा समाजात अव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता असेल, अशा प्रकारची आवेशपूर्ण भाषणे, घोषणा, गाणी, हावभाव, प्रतिमा, फलक, चिन्हे अथवा आक्षेपार्ह साहित्याचे प्रदर्शन व प्रसार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
पूर्वपरवानगीशिवाय मिरवणुकीला बंदी
उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणालाही मिरवणूक काढता येणार नाही. तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर अथवा सार्वजनिक चावडीवर एकत्र जमणे किंवा कोणताही कार्यक्रम आयोजित करणे यावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करून शांतता, सलोखा आणि सामाजिक सौहार्द कायम ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सदर आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी ३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहेत.










