काल्याच्या कीर्तनासह महाप्रसादासाठी भाविकांची मोठी गर्दी
प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या निमित्ताने हनुमान मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काल्याचे कीर्तन व महाप्रसादासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सप्ताहादरम्यान काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, हरिपाठ तसेच विविध कीर्तनांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये श्री ह. भ. प. शुभम महाराज थोरात (अहमदाबाद), श्री ह. भ. प. केशव महाराज पवार (शिवव्याख्याते, जालना), श्री ह. भ. प. गणेश महाराज फरताळे (वडू), श्री ह. भ. प. योगेश महाराज शिंदे (जामगाव), श्री ह. भ. प. नवनाथ महाराज माशेरे (झी टॉकीज, अहमदाबाद), ह. भ. प. शंकर महाराज गणगे (शेवगाव) तसेच श्री ह. भ. प. श्रीराम महाराज घुले (रावडेवाडी) यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांतून भाविकांना मार्गदर्शन केले.
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने विशेष कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. हरिभक्त पारायण नितीन महाराज सुक्रे यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण प्राप्त झाले. रात्री १० वाजून ५ मिनिटांनी श्रीकृष्ण जन्माचा सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी पुष्पवृष्टी केली, तर महिलांनी पारंपरिक पाळणा म्हणत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला.
त्यानंतर सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली. ह. भ. प. नितीन महाराज सुक्रे यांच्या काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम सकाळी १० ते १२ या वेळेत पार पडला. कीर्तनानंतर जन्माष्टमीची आरती करण्यात आली.
या धार्मिक सोहळ्यासाठी निमगाव दुडे तसेच दुडेवाडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निमगाव दुडे व दुडेवाडी येथील भाविकांनी विशेष परिश्रम घेतले. सप्ताहाच्या सांगतेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

