
१८ शाळांमधील ६६ विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांना तालुकास्तरीय स्पर्धेची संधी
पाचोरा : जळगाव जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांच्या सूचनेनुसार आणि पाचोरा गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा उर्दू केंद्र स्तरावर ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद उर्दू शाळा, पाचोरा येथील मौलाना आझाद सभागृहात शुक्रवारी ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या १८ शाळांमधील एकूण ६६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून देणे, त्यांचा शब्दसंग्रह वाढविणे तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख शेख जावेद रहीम होते. स्पर्धेच्या आयोजन व व्यवस्थापनाची जबाबदारी रेहान खान, सय्यद फैजान, नगमा फातेमा आणि सना फिरदोस यांनी सांभाळली.
केंद्रस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तालुकास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. उर्दू विभागाच्या स्पर्धेसाठी केलेल्या उत्तम तयारीचे आणि विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी कौतुक केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अल्ताफ हुसैन, मुख्याध्यापक एजाज बागवान, रईस सुबहान, अशफाक शेख, कदीर शेख, मोमीन अब्दुल मलिक, मोईन सय्यद, रुकय्या शेख, समीना शेख, उजमा फातेमा आणि माजिदा अंजुम यांनी मोलाचे योगदान दिले.
विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेतील आकलन, शब्दलेखन आणि आत्मविश्वासाला चालना देणाऱ्या या उपक्रमामुळे पाचोरा उर्दू केंद्रातील शैक्षणिक वातावरणात उत्साह निर्माण झाला.
