डी.जे. बंदी, खाण प्रकल्प, विद्यार्थी प्रश्न अन् आदिवासी हक्कांवर मंथन
प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. ५ सप्टेंबर २०२६
एटापल्ली : सुरजागड पारंपरिक इलाका ग्रामसभेची मासिक सभा शनिवार, ५ सप्टेंबर रोजी पिपली बुर्गी येथे पार पडली. बुर्गी गावचे गाव पाटील दिलीप नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामसभा व्यवस्था, डी.जे. बंदी, खाण प्रकल्प, विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच आदिवासी हक्कांबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सभेत प्रति कुटुंब वर्गणी निश्चित करण्यासह डी.जे. बंदीच्या नियमांची अंमलबजावणी आणि संबंधित दंड वसुलीबाबत चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले.
युवक-युवतींसाठी अभ्यासगट उभारणार
आदिवासी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासोबतच पेसा कायदा, वनहक्क कायदा, पारंपरिक व्यवस्था, रूढी-परंपरा व सांस्कृतिक वारसा यांचा अभ्यास करावा, यासाठी इलाका स्तरावर सुशिक्षित युवक-युवतींचे अभ्यासगट उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली.
खाण प्रकल्पाबाबत ग्रामसभेची भूमिका चर्चेत
सुरजागड परिसरातील खाण प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभेची एनओसी देण्याबाबतची भूमिका, त्याचे संभाव्य परिणाम आणि पारंपरिक ग्रामसभेच्या अधिकारांची व्याप्ती यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
विद्यापीठातील नियुक्तीवर चर्चा
गोंडवाना विद्यापीठातील ग्रामसभा समन्वयक पदावरील एका नियुक्तीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आक्षेपांवरही चर्चा झाली. या प्रकरणी ग्रामसभांच्या वतीने निषेध नोंदविण्याबाबत पुढील भूमिका ठरविण्याचा मुद्दा चर्चेत आला.
वसतिगृह खासगीकरणाला विरोध
आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांच्या प्रस्तावित खासगीकरणाचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला. ५ ऑगस्ट रोजी जारी झालेल्या शासन निर्णयाबाबत ग्रामसभेच्या माध्यमातून विरोध व निषेध नोंदविण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीत आदिवासी समाजाचे हक्क, शिक्षण, सांस्कृतिक वारसा, पारंपरिक ग्रामसभा व्यवस्था आणि स्थानिक संसाधनांवरील ग्रामसभेची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी आगामी काळात ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली.









