
प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्यांवर जागेवरच तोडगा
श्रीगोंदा | प्रतिनिधी : श्रीगोंदा शहरातील ‘माऊली संपर्क कार्यालय’ येथे आमदार विक्रम पाचपुते यांच्या विशेष पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘जनता दरबारा’ला तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या विविध प्रलंबित शासकीय अडचणी व तक्रारी आमदारांसमोर मांडल्या.
या जनता दरबाराला तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेची मोठी उपस्थिती होती. तहसीलदार सचिन डोंगरे, गटविकास अधिकारी राणीताई फराटे आणि पोलीस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ यांच्यासह वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण विभाग, भूमी अभिलेख, कृषी विभाग आणि सिंचन विभागाचे प्रमुख अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
जनता दरबारात आमदार विक्रम पाचपुते यांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या शांतपणे आणि आपुलकीने जाणून घेतल्या. केवळ आश्वासन न देता त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देत अनेक प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक मार्ग काढण्याचे निर्देश दिले.
विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित असल्याने नागरिकांचे शासकीय कार्यालयांचे हेलपाटे वाचले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांना यामुळे गती मिळाली. नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या या उपक्रमाचे तालुक्यातून स्वागत होत असून आमदार पाचपुते यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
