
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गौरव
आजरा | सारथी महाराष्ट्राचा वृत्तसेवा : शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय, समाजोपयोगी आणि प्रेरणादायी योगदानाची दखल घेत ‘अण्णाभाऊ संस्था समूह, आजरा’चे प्रमुख श्री. अशोकअण्णा चराटी यांना नवभारत-नवराष्ट्र समूहाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘राजर्षी शाहू सन्मान सोहळा २०२६’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते श्री. अशोकअण्णा चराटी यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी वृत्तसमूहाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा
ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, शिक्षण क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे तसेच हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्यपूर्ण योगदान देणे, या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. अशोकअण्णा चराटी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली अण्णाभाऊ संस्था समूहाने पश्चिम महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला सामाजिक न्याय, शिक्षणाचा प्रसार आणि समाजकल्याणाचा विचार पुढे नेणाऱ्या अशोकअण्णा चराटी यांच्या कार्याचा हा यथोचित गौरव असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले.
‘राजर्षी शाहू सन्मान २०२६’ पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. अशोकअण्णा चराटी यांचे शिक्षण, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
