
पावसातील खंड, रोग-किडीचा प्रादुर्भाव व संभाव्य उत्पादन घटेचा घेतला आढावा
नायगाव (वार्ताहर) : मा. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या आदेशानुसार खरीप हंगाम २०२६ मध्ये पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नायगाव परिसरातील पिकांची पाहणी पथकाकडून करण्यात आली.
यावेळी पिकांची सद्यस्थिती, पिकांच्या वाढीच्या अवस्था, पावसातील खंडामुळे पिकांवर झालेला परिणाम, पिकांवरील रोग व किडीचा प्रादुर्भाव, जमिनीतील ओलाव्याची स्थिती तसेच संभाव्य उत्पादनातील घट याबाबत वस्तुनिष्ठ व शास्त्रीय पद्धतीने पाहणी करण्यात आली.
पाहणी पथकामध्ये अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी कळंब श्री. गणेश शिंदे, श्रीमती प्राजक्ता पाटील, वाशी, जिल्हा परिषद सदस्य नायगाव गट श्री. राजाभाऊ दादा पाटील, पंचायत समिती कळंबच्या सभापती श्रीमती राजश्रीताई वर्पे यांच्यासह वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे, प्रगतिशील शेतकरी श्री. कमलाकर जनार्दन पाटील, मंडळ अधिकारी नायगाव श्रीमती वर्षा ढेकरे, ग्राम महसूल अधिकारी नायगाव श्री. संजय माळी, सहायक कृषी अधिकारी नायगाव श्रीमती काकडे पी.ए., ग्रामपंचायत सदस्य श्री. अनिल माळी, पत्रकार श्री. विकास वाघ तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम आणि सध्याची शेतीची परिस्थिती जाणून घेतली. पाहणीदरम्यान पिकांची प्रत्यक्ष स्थिती, जमिनीतील ओलावा आणि रोग-किडीच्या प्रादुर्भावाची पाहणी करून संभाव्य उत्पादन घटेबाबत वस्तुनिष्ठ माहिती संकलित करण्यात आली.
या पाहणीच्या आधारे खरीप पिकांच्या सद्यस्थितीचा अहवाल संबंधित प्रशासनाकडे सादर करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील उपाययोजनांसाठी मदत होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
