
पावसाअभावी पिके धोक्यात; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची हरी अण्णा जाधव यांची मागणी
सटाणा : प्रतिनिधी
बागलाण तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी पिके सुकण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने बागलाण तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरी अण्णा जाधव यांनी केली आहे.
पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच विविध अडचणींमुळे कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिकांचे नुकसान होण्याचे नवे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, पीक विमा व शासकीय मदतीचा लाभ मिळवून द्यावा तसेच आवश्यक त्या सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.
बागलाण तालुक्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता शासनाने संवेदनशील भूमिका घेत बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी हरी अण्णा जाधव यांनी केली आहे.
