
हॉल परिसरातील कचरा व गवत PWD कार्यालयात नेऊन टाकत प्रशासनाचा निषेध
अकोला : प्रतिनिधी
अकोला शहरातील ऐतिहासिक व महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माँ जिजाऊ हॉल आणि परिसराची प्रशासकीय दुर्लक्षामुळे दुरावस्था झाल्याचा आरोप करत वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आक्रमक सफाई आंदोलन करण्यात आले. हॉलच्या नूतनीकरण व स्वच्छतेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला असतानाही परिसरात मोठे गवत, घाण व कचरा साचल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी हॉल परिसरातील वाढलेले गवत व कचरा गोळा केला. त्यानंतर हा कचरा थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यालयात नेऊन टाकण्यात आला. या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक वास्तूंची नियमित स्वच्छता व देखभाल करणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले. जनतेच्या पैशातून उभारलेल्या वास्तूंची योग्य देखभाल न झाल्यास नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वी निवेदने व आंदोलने करूनही प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे आंदोलकांनी म्हटले.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देताना, “वारंवार निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” अशी भूमिका मांडली. माँ जिजाऊ हॉल परिसराची तातडीने स्वच्छता करून नियमित देखभाल व्यवस्था सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, युवक आघाडी जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, नगरसेवक निलेश देव, माजी नगरसेवक गजानन गवई, अकोला युवक तालुका अध्यक्ष मिलिंद दामोदर, तसेच सचिन शिराळे, आशिष सोनोने, संजय बावणे, राजेश बोदडे, प्रदीप इंगळे, सुनील शिराळे, अनुराधाताई ठाकरे, ज्योती खिल्लारे, सरलाताई मेश्राम, शुभम वानखडे, मयुर दामोदर, शेख अन्सार, अशोक मेश्राम आणि आकाश जंजाळ यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आंदोलनानंतर माँ जिजाऊ हॉल परिसराची तातडीने स्वच्छता करून त्याची नियमित देखभाल करावी, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली.
