महाविद्यालय मार्गावरील बिअर बारच्या स्थलांतरासाठी स्वाक्षरी अभियान; पहिल्याच टप्प्यात शंभरपेक्षा अधिक स्वाक्षऱ्या
फुलसावंगी, प्रतिनिधी :
महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गालगत उभारण्यात आलेल्या बिअर बारच्या विरोधात आता विद्यार्थ्यांसाठी नागरिकांनी आवाज उठविला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि शैक्षणिक वातावरणाचा प्रश्न उपस्थित करीत संबंधित बिअर बार इतर योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, पहिल्याच टप्प्यात शंभरपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षऱ्या करून या मागणीला पाठिंबा दर्शविला.
फुलसावंगी येथील किनवट मार्गावर स्वर्गीय सुधाकरराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय आणि शिवरामजी मोघे कनिष्ठ महाविद्यालय असून, या दोन्ही महाविद्यालयांमध्ये जवळपास चारशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थिनी महाविद्यालयात ये-जा करतात. परिसरात अद्याप अपेक्षित प्रमाणात वर्दळ नसल्याने हा मार्ग काहीसा निर्जन स्वरूपाचा आहे.अशा परिस्थितीत महाविद्यालयाच्या मार्गालगतच बिअर बार सुरू झाल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. विद्यार्थ्यांच्या ये-जा करणाऱ्या मार्गावर अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.
चौकट-
- परवानग्यांवरही प्रश्नचिन्ह
संबंधित बिअर बारसाठी विविध विभागांकडून आवश्यक परवानग्या देताना नियम व निकषांचे पालन करण्यात आले का? याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. नगररचना विभागाने या परिसरातील संबंधित जागेचा वापर आणि त्याठिकाणी अशा स्वरूपाच्या व्यवसायास परवानगी देताना सर्व बाबींची पडताळणी केली का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
महाविद्यालयाच्या मार्गावर सुरू झालेल्या या व्यवसायामुळे भविष्यात परिसरातील शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि विशेषतः विद्यार्थिनींची महाविद्यालयाकडे ये-जा हा मुद्दा अधिक संवेदनशील असल्याने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी होत आहे.
- तरुणांचा पुढाकार, आंदोलनाची तयारी
या पार्श्वभूमीवर फुलसावंगी येथील काही तरुणांनी पुढाकार घेत स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे. ‘बिअर बार हटवा, विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवा’ या भूमिकेतून राबविण्यात आलेल्या अभियानाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अभियानातून संकलित करण्यात येणाऱ्या स्वाक्षऱ्यांसह संबंधित प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पालकांच्या भावना आणि परिसरातील शैक्षणिक वातावरण लक्षात घेऊन संबंधित बिअर बारचे अन्य योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी अभियान कर्ते तसलीम शेख, योगेश चौधरी, वंचीत बहुजन आघाडी चे तालुका उपाध्यक्ष शेख सद्दाम,शेरखान पठाण,अब्दुल रहेमान, शेख सबील यांनी केली आहे.आता या स्वाक्षरी अभियानाची प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काय निर्णय घेतला जातो, याकडे फुलसावंगीकरांचे लक्ष लागले आहे.










