सुरेंद्र सोनवणे, पारगाव प्रतिनिधी :
पारगाव (शिंगवे) येथे शूरवीर जीवा महाले व श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. श्रीराम मंदिर चौकात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात भव्य भजन महोत्सव, हरिकीर्तन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध भजनी मंडळे आणि कलाकारांच्या सादरीकरणामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
आंबेगाव तालुका नाभिक संघाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सुरुवात सकाळी ८.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. त्यानंतर सकाळी ९ वाजता प्रतिमेची पारगाव परिसरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ह.भ.प. स्वप्निल महाराज दातखिळे यांचे प्रभावी हरिकीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनातून उपस्थित भाविकांना आध्यात्मिक विचारांची मेजवानी मिळाली.
दुपारी १२ वाजता श्री संत ज्ञानेश्वर प्रसादिक भजनी मंडळ, पारगाव (शिंगवे) यांच्या भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर श्री भैरवनाथ प्रसादिक संगीत भजन मंडळ, ढाकाळे यांनी भक्तिगीते व भजनांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पारगावमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
हा सोहळा श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा समिती, आंबेगाव तालुका नाभिक समाज आणि समस्त ग्रामस्थ पारगाव (शिंगवे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची माहिती सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे यांनी दिली.









