करमाळा प्रतिनिधी : ‘डीजे’ला परवानगी नसून सामाजिक उपक्रम राबवून मंडळीनी गणेशोत्सव साजरा करावा’, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी केले आहे. अनावश्यक खर्च टाळून मंडळांनी शैक्षणिक व सामाजिक कामावर खर्च करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे. जिल्हाधिकरी व पोलिस अधीक्षक यांच्या आदेशाचे पालन करत शांततेत गणेशोत्सव साजरा करा, असे त्या म्हणाल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात पोलिस, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व पोलिस पाटील यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीवेळी करमाळा पोलिस ठाणेअंतर्गत २०२५ मध्ये झालेल्या आदर्श गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरणही करण्यात आले. याचे स्वरूप प्रशस्तीपत्र व स्नमनचिन्ह असे होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा, पोलिस निरीक्षक रणजित माने, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, वीज वितरण कंपनीचे श्री. राजमाने उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर प्रीतीजा वेदपाठक नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक विपुल पुजारीआदी उपस्थित होते. मंडळाचे निवड करण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती. यामध्ये तालुक्यातील सर्व पोलीस पाटील याचा समावेश होता.
पोलिस निरीक्षक माने यांनी यावेळी गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्याचेही त्यांनी आवाहन केले. २०२५ मध्ये झालेल्या गणेशोत्सव स्पर्धेबाबतही त्यांनी माहिती दिली. मंडळांनी चांगले काम करण्याबाबही त्यांनी सूचित केले. जामा मशीद येथून गणेश विसर्जन मिरवणुकीवर होणाऱ्या पुष्पवृष्टीचे त्यांनी कौतुक केले. मंडळांनी सामाजिक उपक्रमावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी.
डीवायएसपी अंजना कृष्णा यांनी गणेशोत्सवाचा पार्श्वभूमीवर डीजेमुक्त मिरवणुका काढण्याचे आवाहन केले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशोत्सव होत असल्याचे कौतुक सर्वत्र होत असून आपण त्याला हातभार लावावे, असे त्या म्हणाल्या. वीज वितरण कंपनीने योग्य ती खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.
गणेशोत्सव मंडळांची मागणी
करमाळा शहरात गणेशोत्सवानिमित्त एक दिवस देखावे असतात. मात्र हे देखावे पहाण्यासाठी वेळ कमी पडत असून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत देखावे सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. करमाळ्यात गणेशोत्सवाचे देखावे पहाण्यासाठी ग्रामीण भागातून भाविक येतात. मात्र हे देखावे पहाण्यासाठी वेळ कमी पडतो. त्यामुळे मध्यरात्री १२ पर्यंत वेळ दिल्यास सर्व देखावे पहाता येतील, असे मंडळाचे पदाधिकारी म्हणाले.
बक्षीस वितरण करण्यात आलेली मंडळे (क्रमशः)
देखावा
१) छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली
२) लोकमान्य टिळक मित्र मंडळ, किल्ला विभाग
३) अहिल्यादेवी हिंदू खाटीक तरुण मंडळ, खाटीक गल्ली
मिरवणूक
१) लोकमान्य तरुण मित्र मंडळ, फंड गल्ली
२) राजेरावरंभा तरुण मंडळ, श्रीदेवीचामाळ
३) नवजावन सुतार तालीम तरुण मंडळ, सुतार गल्ली
विशेष सन्मान…
वेताळ पेठ येथील जामा मशिदीवरून गणेश विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली जाते. हिंदू- मुस्लिम धर्माचे हे ऐक्य मानले जाते. त्यामुळे जामा मशिदीचे विश्वस्त यांचा यावेळी विशेषश गौरव करण्यात आला.









