गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन
उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे
माहूर : गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा उत्सव आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजेचा आग्रह न धरता पारंपरिक वाद्यांचा वापर करून गणेशोत्सव साजरा करावा. तसेच संबंधित सर्व विभागांच्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन उत्सव आनंदात, उत्साहात व शांततेत साजरा करावा, असे आवाहन माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी बालाजी मंगलम येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
बैठकीस निवासी नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, उपनगराध्यक्ष नाना लाड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रीतम वसमतकर, नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक गजलवाड, नगर अभियंता विशाल ढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माहूर शहर व ग्रामीण भागातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील तसेच पत्रकार वंसंत कपाटे, नंदकुमार जोशी, विजय आमले, जयकुमार अडकीने,मनोज कीर्तने राज ठाकूर, अनिल माडपेलीवार, विकास कपाटे, विनोद सूर्यवंशी, पद्मा गिऱ्हे, सुरेखा तळणकर यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
मिरवणूक मार्ग, विद्युत व्यवस्था अन् विसर्जनस्थळावरील अडचणी चा मुद्दा
बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गातील अडथळे, विद्युत व्यवस्था, विसर्जनस्थळी आवश्यक उपाययोजना तसेच डीजे वापरण्याच्या परवानगीसंदर्भातील अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.
यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी डीजे परवानगीचा विषय वगळता मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करणे, विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच विसर्जनस्थळी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ध्वनिप्रदूषण टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत उत्सव साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.








