
रायगड जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; अलिबागच्या मनस्वी ग्रुपला प्रथम क्रमांक
रायगड : वार्ताहर
दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती रेखाताई पाटील यांच्या आयोजनाखाली जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा २०२६ मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि आनंदमय वातावरणात पार पडली. या स्पर्धेला रायगड जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातील विविध भागांतून असंख्य महिला स्पर्धकांनी मंगळागौर स्पर्धेत सहभाग घेतला. पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांचे सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांचा उत्साह यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले होते.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अलिबागच्या मनस्वी ग्रुपने, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पेणच्या मांगल्य ग्रुपने पटकावले. उत्तेजनार्थ पारितोषिक पेणच्या सोमजाई ग्रुपला मिळाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा वर्षाताई भोसले तसेच सुप्रसिद्ध गायिका धनश्री कडगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा तथा अर्थ व बांधकाम सभापती निलिमाताई पाटील आणि पेण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितमताई पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.
मंगळागौर स्पर्धेच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि महिला एकजुटीचे दर्शन घडविले. संपूर्ण कार्यक्रम जल्लोषपूर्ण आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
