विभागीय प्रतिनिधी
यावल – जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने अंतिम प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार यावल तालुक्यातील तब्बल ४६ ग्रामपंचायतींवर पुढील सहा महिने पुन्हा एकदा प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे.
लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने आणि तातडीने निवडणुका घेणे प्रशासकीय कारणांमुळे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या या सर्व ग्रामपंचायतींचा कारभार शासकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मात्र या प्रशासकीय व्यवस्थेमुळे ग्रामीण भागातील विकासकामे आणि नागरी सुविधा रखडून पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त होत असून, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद जळगाव, ग्रामपंचायत विभागाने काढलेल्या आदेशानुसार (जा.क्र. ग्रापं/०१/आरआर/१०१३/२०२६, दिनांक ०८/०९/२०२६) मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ (३) च्या कलम १५१ अंतर्गत राज्य शासनाने प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
शासकीय कर्मचाऱ्यांवर ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असून हा पदभार ६ महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू असणार आहे.
कोणत्या अधिकाऱ्याकडे कोणत्या गावांचा कारभार?
या आदेशानुसार तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायतींची जबाबदारी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.
⏺️विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) एस. बी. भदाणे यांच्याकडे आडगावसह आमोदे, चिंचोली आणि उटखेडा या ग्रामपंचायतींचा कार्यभार असेल.
⏺️के. सी. सपकाळे यांच्याकडे ५ ग्रामपंचायती – बामणोद, भालोद, बोरखेडा बु., मारूळ, नायगाव यांचा पदभार सोपवला आहे.
⏺️एन. बी. वैराळकर यांच्याकडे वडोदे प्र. सावदा, विरोदा, सांगवी बु. आणि वनोली या ४ गावांची जबाबदारी राहील.
⏺️कृषी विस्तार अधिकारी रमेश विश्वाळे यांच्याकडे वडोदे प्र. यावल, विरावली, किनगाव बु. आणि डांभुर्णी या गावांची धुरा देण्यात आली आहे.
⏺️कृषी विस्तार अधिकारी जी. टी. सोनवणे हे दुसखेडा, हंबर्डी, राजोरा आणि सांगवी खुर्द या ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून काम पाहतील.
⏺️सार्वजनिक बांधकाम अभियंता गणेश ठाकूर यांच्याकडे टाकरखेडा, हिंगोणे व डोंगर कठोरा तर
⏺️कृषी विस्तार अधिकारी ई. के. चौधरी यांच्याकडे कासवे, कोसगाव आणि अंजाळे ग्रामपंचायतीचा पदभार असेल.
⏺️याशिवाय महिला व बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका अर्चना राजेंद्र आटोळे यांच्याकडे सातोद व कोळवद, तर
⏺️आरती इंगळे यांच्याकडे अट्रावल,
⏺️डी. जी. निळे यांच्याकडे बोरखेडा खुर्द,
⏺️तर केंद्र प्रमुख मोहम्मद हबीब तडवी यांच्याकडे कोरपावली ग्रामपंचायतीच्या प्रशासक पदाची सूत्रे देण्यात आली आहेत.
एकाच अधिकाऱ्याकडे अनेक गावांचा अतिरिक्त पदभार असल्याने ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सुटणार की अधिक जटिल होणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.









