शहादा,दि.11(प्रतिनिधी): टीम व्हिजन शहादाच्या वतीने स्कूल ठिक करो या उपक्रमांतर्गत शहादा शहरातील 14 नगरपरिषद शाळांचे सविस्तर सोशल ऑडिट पूर्ण करण्यात आले आहे.सदर अहवाल जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी यांना सुपूर्द करण्यात आला आहे.
या ऑडिटमधून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाबी तसेच पायाभूत सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची आवश्यकता असलेली महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर आली आहेत.
टीम व्हिजन शहादाचे संस्थापक विशाल निकूम यांच्या नेतृत्वाखाली टीमने 11 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व 14 शाळांचे सविस्तर अहवाल सादर केले. यावेळी प्रतिनिधींनी ऑडिटमधून समोर आलेल्या प्रमुख त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची गरज याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर माहिती दिली.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या बाबींवर प्रशासनाकडून त्वरित कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे असल्याचे टीमने यावेळी स्पष्ट केले.या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश दिले. विशेषतः शाळा क्रमांक 11 मध्ये तात्काळ पोर्टेबल शौचालय बसविण्याच्या सूचना शहादा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या, तसेच सर्व नगरपरिषद शाळांमधील शौचालयांची तात्काळ सुधारणा करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यासोबतच सर्व शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये लवकरात लवकर सुधारणा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. टीमने केलेले हे सोशल ऑडिट केवळ त्रुटी दाखविण्यापुरते मर्यादित नसून शाळांमध्ये सुरक्षित, स्वच्छ आणि योग्य शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.स्कूल ठिक करो उपक्रमाच्या माध्यमातून शहादा शहरातील शाळांचे प्रश्न प्रशासनासमोर ठोस पुराव्यांसह मांडून त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार टीम व्हिजन शहादाने व्यक्त केला आहे.










