भटक्या-विमुक्त समाजाच्या इतिहास, संस्कृती व योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती; शिक्षण आणि आरोग्य जनजागृतीवर भर
मांडवगण फराटा : प्रतिनिधी
मांडवगण फराटा येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत भटके विमुक्त दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून श्रीकांत स्वरूप खोमणे यांनी विद्यार्थ्यांना भटके-विमुक्त दिवस साजरा करण्यामागील इतिहास, या समाजाची संस्कृती तसेच स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना श्रीकांत खोमणे म्हणाले की, भटके-विमुक्त समाज हा केवळ एक समाज नसून भारताच्या विविधतेत एकतेचे दर्शन घडविणारी समृद्ध संस्कृती आहे. मसनजोगी, नंदीवाले, लमाण, रामोशी, बंजारा, कैकाडी, पारधी यांसह विविध भटक्या-विमुक्त समाजघटकांचा इतिहास विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.
रामोशी समाजाकडे असलेली वतने, किल्ल्यांच्या राखणदारीची जबाबदारी, नंदीवाले समाजामार्फत स्वराज्याच्या काळात तसेच स्वातंत्र्यलढ्यात माहितीची देवाणघेवाण, कैकाडी व पारधी समाजाचे पारंपरिक व्यवसाय याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. बंजारा समाजाच्या चालीरीती, वेशभूषा आणि सामाजिक योगदानावरही त्यांनी प्रकाश टाकला.
यावेळी ताजमहालाच्या निर्मितीचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यात आला. सर्वसाधारणपणे ताजमहाल शहाजहानने बांधला असे उत्तर दिले जाते; मात्र त्याच्या निर्मितीत लोहार, अवताडे, घिसाडी आणि अन्य भटक्या समाजातील कुशल कारागिरांचे योगदान असल्याचे श्रीकांत खोमणे यांनी सांगितले. ताजमहालातील नक्षीकाम आणि विविध कारागिरीमध्ये अशा पारंपरिक कौशल्य असलेल्या समाजघटकांचे योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानावरही त्यांनी भाष्य केले. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या जाहीरनाम्याचा संदर्भ देत त्यांच्या क्रांतिकारी विचारांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारकाचा सन्मान झाला पाहिजे आणि त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण व आरोग्य जनजागृतीवर भर
यावेळी मीरा राठोड यांनी भटक्या-विमुक्त समाजासोबत काम करताना जाणवणाऱ्या विविध प्रश्नांवर भाष्य केले. विशेषतः महिलांमधील शिक्षणाचा अभाव आणि आरोग्यविषयक जनजागृतीची कमतरता ही महत्त्वाची आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले.
भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने काम करण्याची गरज असून, समाजाला स्वतःचा इतिहास आणि वारसा समजणे आवश्यक आहे. त्यातून समाजाचे अस्तित्व, आत्मविश्वास आणि प्रगतीला चालना मिळेल, असे राठोड यांनी सांगितले. एकल महिला, विधवा महिला तसेच इतरांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक महिला व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘भटके विमुक्त दिवस क्रांतिकारी दिवस म्हणून साजरा करू’
कार्यक्रमाच्या समारोपावेळी शाळेचे उपप्राचार्य पाचकर सर यांनी आभार मानले. भटके-विमुक्त दिवस हा यापुढे एक महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी दिवस म्हणून साजरा केला जावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र भटक्या-विमुक्त समाजावर लागू असलेल्या तत्कालीन कायदेशीर निर्बंधांमुळे या समाजाला त्यानंतरही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा समाज त्या निर्बंधांतून मुक्त झाला, या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहितीही त्यांनी दिली.
आजही काही भटक्या-विमुक्त समाजघटक विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. त्यांना शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी श्रीकांत खोमणे व मीरा राठोड यांच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून सुरू असलेले काम महत्त्वाचे आहे. त्यांच्या उपक्रमांना शाळेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य भविष्यातही करण्यात येईल, अशी ग्वाही पाचकर सर यांनी दिली.
भटके-विमुक्त दिवस शाळेत साजरा करून विद्यार्थ्यांना समाजाचा इतिहास, संस्कृती आणि योगदान समजावून सांगितल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.






