डॉल्बी, आकर्षक रोषणाई आणि भव्य देखाव्यांचा खर्च टाळणार; बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी देवीचरणी प्रार्थना
तेल्हारा | प्रतिनिधी :
तेल्हारा तालुक्यातील पिवंदळ बुद्रुक येथे यंदा दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवदुर्गा उत्सव मंडळांनी नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा उत्सव यंदा पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटाच्या छायेत होत आहे.
पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पिके करपण्याच्या मार्गावर असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवून अनेक सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी डॉल्बी, आकर्षक रोषणाई आणि भव्य देखाव्यांवरील खर्च टाळून साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त देवीची घटस्थापना करताना भाविकांकडून बळीराजाच्या सुखासाठी, पिकांना जीवनदान देणारा पाऊस पडावा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा समृद्धी यावी, अशी प्रार्थना केली जात आहे.
एका मंडळाच्या कार्यकर्त्याने भावना व्यक्त करताना सांगितले, “देवी सर्वांची आई आहे. शेतकरी जगला तरच उत्सव टिकेल. त्यामुळे यंदा आम्ही साध्या पद्धतीने देवीची पूजा करून बळीराजाच्या सुखासाठी प्रार्थना करणार आहोत.”
दरम्यान, तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घ्यावा, दुष्काळाबाबत योग्य निर्णय घ्यावा आणि शेतकरी व पशुधनासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
यंदाचा नवरात्रोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत आहे. उत्सवाचा दिखावा कमी करून बळीराजाच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न पिवंदळ बुद्रुकमधील मंडळांनी केला आहे.





