पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो; विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णांना करावा लागतो अडचणींचा सामना
तेल्हारा | प्रतिनिधी :
तेल्हारा तालुक्यातील पंगव्हाण फाटा ते निंभोरा या मुख्य रस्त्यावरील नाल्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर आल्यास गावाचा संपर्क तुटतो. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, येथे अपघात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्यावर पुलाची प्रतीक्षा कायम आहे. संबंधित रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी नाल्यावर अद्याप पूल बांधण्यात आलेला नाही. पावसाळ्यात नाल्यातून पाणी वाहत असल्याने विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
मागील वर्षी या नाल्याला आलेल्या पुरात पंगव्हाण येथील एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे नाल्यावर पूल नसल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अडचणी येतात, तर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात पोहोचण्यासाठी गैरसोयींचा सामना करावा लागतो.
मजबूत आणि उंच पुलाची मागणी
पावसाळ्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी तसेच ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित प्रशासनाने या नाल्याची पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात. पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन येथे मजबूत व उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
या मागणीकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन पुलाच्या बांधकामासाठी लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.







