दोडामार्ग/दिपक जाधव (प्रतिनिधी):
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण घटल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी तेंडोली गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी एक आदर्श पाऊल उचलले आहे. केवळ आपल्या दैनंदिन कामापुरते मर्यादित न राहता, या महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
गावातील पाणीटंचाईची भीषणता ओळखून या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हातात फावडे व घमेले घेऊन थेट कामाच्या ठिकाणी उतरल्या. यामध्ये अनन्या तेंडोलकर, अदिती तेंडोलकर, सुधा तेंडोलकर, प्रिया खानोलकर, भाग्यश्री कुंभार, हेमांगी थोरबोले, अलका चव्हाण, प्रतिभा तेंडोलकर, शैलजा मुणनकर, श्रमिता परब, रसिका राऊळ, कुंदा राऊळ, प्रमिला गावडे आणि मिलन खानोलकर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवणे आणि भूजल पातळी वाढवणे या उद्देशाने या सर्व महिलांनी प्रत्यक्ष श्रमदान करत हा बंधारा उभारला. त्यांच्या या कृतीतून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
सध्याच्या टंचाईच्या काळात जमिनीत पाणी मुरवणे अत्यंत गरजेचे बनले असून, अशा वनराई बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. या महिलांनी स्वतः राबून गावकऱ्यांसमोर जलसंधारणाचा एक प्रेरणादायी संदेश ठेवला आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे तेंडोली आणि परिसरामध्ये त्यांचे प्रचंड कौतुक होत आहे. त्यांच्या या पुढाकारामुळे गावातील जलसंधारणाची चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.











