भोर प्रतिनिधी नरेंद्र यादव
भोर : व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) या प्रतिबंधित व मौल्यवान पदार्थाच्या तस्करीविरोधात भोर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. श्रीवर्धन येथील पाच जणांना नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईत सुमारे पाच किलो व्हेल माशाची उलटी आणि अंदाजे पाच कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोर पोलिसांनी नाकाबंदीच्या वेळी संशयितांची तपासणी केली असता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील पाचही जणांना पुढील तपासासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत मिळत असल्याने तिची अवैध तस्करी केली जाते. मात्र, अशा प्रकारच्या तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून कारवाई केली जाते. भोर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे तस्करीच्या प्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
या प्रकरणामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, तसेच जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या व्यवहाराचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, याबाबत पुढील तपासातून माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
भोर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











