अहिल्यानगर:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिचोंडी पाटील (ता. जि. अहिल्यानगर) येथील शिक्षकांनी शाळेच्या वेळेत भ्रमणध्वनी (मोबाईल) बंद ठेवून अभ्यासावर आणि गुणवत्तेवर भर देण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या अभिनव उपक्रमाचे अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी (भा.प्र.से.) यांनी विशेष कौतुक करत शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे पत्राद्वारे अधिकृत अभिनंदन केले आहे.
काय आहे उपक्रम?
शाळेतील सर्व १६ शिक्षक सकाळी शाळेत आल्यावर आपले मोबाईल फोन जमा करतात. सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत मोबाईलचा कोणताही वापर न करता पूर्ण वेळ विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी दिला जातो. त्यानंतर दुपारी ४.०० वाजता मोबाईल पुन्हा ताब्यात घेऊन त्याच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना ‘इंटरॅक्टिव्ह बोर्ड’च्या (Interactive Board) माध्यमातून आधुनिक व तंत्रज्ञानस्नेही शिक्षण दिले जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी काय म्हटले?
काही काळापूर्वी शाळेतील संगणक प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व शिक्षकांनी मोबाईलपासून दूर राहून वाचनसंस्कृतीकडे वळावे, असे आवाहन केले होते. या आवाहनाला चिचोंडी पाटील शाळेच्या शिक्षकांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.
आपल्या अभिनंदन पत्रात आनंद भंडारी यांनी नमूद केले की, “इयत्ता चौथीपर्यंत ३३० पटाची संख्या असलेल्या या शाळेत शिक्षक व ग्रामस्थांमधील सुसंवादामुळे शाळा प्रगतीपथावर आहे. शिक्षकांनी मोबाईलचा वापर शालेय वेळेत बंद केल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता, मनःशांती आणि वाचनसंस्कृती वाढीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. गुणवत्तेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत आशादायक असून जिल्ह्यातील सर्वच शाळांनी चिचोंडी पाटील शाळेचे हे अनुकरण केले पाहिजे.”
शिक्षकांच्या या उपक्रमामुळे शाळा परिसर आणि शैक्षणिक वर्तुळातून चिचोंडी पाटील शाळेचे विशेष कौतुक होत आहे.











