इतवारा पोलिसांची कारवाई; साजीद खान इनायत खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल:
{नांदेडजिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}
नांदेड-शहरातील देगलूर नाका परिसरात प्रतिबंधित गुटखा,पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्रीच्या उद्देशाने ठेवल्याप्रकरणी इतवारा पोलिसांनी छापा टाकून तब्बल 1 लाख 6 हजार 284 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी साजीद खान इनायत खान (वय 35) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यात अवैध गुटखा,पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक,साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेअंतर्गत इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
गुप्त माहितीवरून छापा
12 ऑक्टोबर 2026 रोजी इतवारा पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत असताना,देगलूर नाका परिसरातील सिटिझन गॅलरी,तुराब नगर येथे एका व्यक्तीने स्वतःच्या घरात विक्रीसाठी प्रतिबंधित गुटखा व पानमसाला साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी सायंकाळच्या सुमारास छापा टाकला. यावेळी साजीद खान इनायत खान हा इसम आढळून आला.
विविध कंपन्यांचा गुटखा जप्त
संबंधित खोलीची झडती घेतली असता पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.यामध्ये विमल पानमसाला,सागर पानमसाला,एसआर-1 सुगंधित तंबाखू आणि मुसाफिर पानमसाला या विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित पदार्थांचा समावेश होता.पोलिसांनी एकूण 1 लाख 6 हजार 284 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि इतवारा विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे,पोलीस उपनिरीक्षक जळबाजी गायकवाड,पोलीस अंमलदार बंडू कलंदर, बालाजी हिंगणकर,शेख इस्राईल आणि महिला पोलीस अंमलदार शबाना यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान,जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला,सुगंधित तंबाखू तसेच इतर प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक,साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे…








