समस्या मांडल्यानंतर ग्रामपंचायतीची तत्पर कार्यवाही; नागरिकांच्या जागरूकतेतून स्वच्छतेचा प्रश्न मार्गी
मंडणगड प्रतिनिधी
मंडणगड : तालुक्यातील भिंगळोली येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष साई सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर भिंगळोली ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेत संबंधित रस्त्याची स्वच्छता केली. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग कचरामुक्त झाला आहे.
काही दिवसांपूर्वी भिंगळोली येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे निदर्शनास आले होते. अंत्यसंस्कारासाठी तसेच स्मशानभूमीकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असल्याने परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या समस्येकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी साई सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला.
त्यानंतर भिंगळोली ग्रामपंचायतीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने कार्यवाही करत रस्त्यावरील कचरा हटविला आणि परिसर स्वच्छ केला. या कार्यवाहीमुळे स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग पुन्हा स्वच्छ व मोकळा झाला आहे.
सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नानंतर झालेल्या या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरी समस्यांच्या निराकरणासाठी नागरिकांची जागरूकता आणि प्रशासनाचा प्रतिसाद महत्त्वाचा असल्याचे अधोरेखित झाले आहे. सार्वजनिक ठिकाणांवरील अस्वच्छतेचे प्रश्न वेळेत समोर येणे आणि त्यावर संबंधित यंत्रणेने योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.
दरम्यान, स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक आणि संवेदनशील ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. केवळ तात्पुरती स्वच्छता न करता भविष्यात पुन्हा कचरा साचू नये, यासाठी नियमित देखरेख, योग्य कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांचे सहकार्य यांवर भर देण्याची आवश्यकता आहे.










