तीन-चार वर्षांपासून डांबरीकरणाची प्रतीक्षा; विद्यार्थी, वाहनधारक त्रस्त, सामाजिक संघटनांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी : कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड ते मजरेवाडी हा रस्ता गेल्या तीन-चार वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक संघटनांनी अनेक आंदोलने केली, निवेदने दिली आणि संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अद्याप या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. सध्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, रस्त्यावर खड्डे पडले आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
सुमारे सात-आठ महिन्यांपूर्वी संबंधित विभागाने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले होते. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून या कामाला विरोध केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सूर्यवंशी आणि कनिष्ठ अभियंता रविराज चव्हाण यांनी एका महिन्याच्या आत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आणि खड्डे बुजविण्यास संमती देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. खड्डे बुजविण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याच्या दर्जाबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काही दिवसांतच रस्त्यावर पुन्हा पूर्वीपेक्षा अधिक खड्डे पडल्याचा आरोप होत आहे.
या खराब रस्त्यामुळे वाहनधारक, नागरिक आणि विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात वाळू वाहतूक करणारा डंपर झाडावर आदळल्याची घटना घडली होती. तसेच रात्रीच्या वेळी दुचाकींचे अपघात होऊन अनेक वाहनधारक जखमी झाल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजापूर येथील एका विद्यार्थिनीने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पत्र लिहून, ‘आमदार काका, रस्ता करून द्या हो! मला खूप शिकायचे आहे. मोठी होऊन कलेक्टर बनायचे आहे,’ अशा भावनिक शब्दांत आपल्या अडचणी मांडल्या होत्या. खराब रस्त्यामुळे शाळेत जाण्यास त्रास होत असल्याची तिची व्यथा लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांनी संबंधित विभागाला रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भातील ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर प्रसारित झाली आहे.
मात्र, मजरेवाडी रस्त्याची समस्या गेल्या तीन-चार वर्षांपासून कायम आहे. वाहनधारक आणि नागरिकांनी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मतदान करूनही आपल्या भागातील मूलभूत समस्या सुटत नसतील, तर लोकप्रतिनिधींनी आमच्या अडचणींकडे लक्ष कधी द्यायचे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मजरेवाडी आणि लक्ष्मीनगर परिसरातील अनेक विद्यार्थी सायकलने तसेच पायी दररोज शिक्षणासाठी कुरुंदवाड येथे ये-जा करतात. या विद्यार्थ्यांना खराब रस्त्यामुळे होणारा त्रास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या लक्षात येत नाही का, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.
सध्या शिरोळ तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर कुरुंदवाड-मजरेवाडी रस्त्यावरील गोपाळ बाग ते अनुप बिअर बारपर्यंतचा सुमारे एक किलोमीटरचा रस्ता तातडीने दर्जेदार पद्धतीने डांबरीकरण करून पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सामाजिक संघटना, वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
गोलंदाज कॉलनीतही नागरी सुविधांचा अभाव
कुरुंदवाडमधील गोलंदाज कॉलनीतील मुख्य रस्ता आणि गटार बांधकामाचा प्रश्नही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कॉलनीची निर्मिती होऊन पाच वर्षे उलटली, तरी अद्याप नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. याबाबत मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांकडे वेळोवेळी विनंती करण्यात आली आहे. आगामी कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने उपलब्ध होणारा निधी योग्य कामांसाठी वापरून गोलंदाज कॉलनीतील रस्ता, गटार आणि इतर मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.











