ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्याला यश; बालरोग चिकित्साशास्त्र विभागासाठी प्रशासकीय मान्यता
सातारा, दि. ३० : येथील छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लवकरात लवकर सुरू होऊन त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, मेडिकल कॉलेजच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व साधनसामुग्री (टर्न कीसह) खरेदी करण्यासाठी १३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सातारा मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या सर्व इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन महाविद्यालय आणि रुग्णालयातील सर्व विभाग पूर्ण क्षमतेने सुरू व्हावेत, यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले सातत्याने प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.
या पाठपुराव्यामुळे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत बालरोग चिकित्साशास्त्र (एनआयसीयू) विभागासाठी आवश्यक यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे. मंजूर निधीमुळे या विभागासाठी आवश्यक उपकरणे आणि सुविधा उपलब्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सातारा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय लवकरात लवकर सुरू होऊन जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळावी, हा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी परिपूर्ण होणे गरजेचे असून, यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
या निधीला मान्यता मिळाल्याबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.











