पोलीस दलाच्या ताफ्यात आधुनिक वाहनांचा समावेश; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी क्रीडा सुविधेला चालना
कोल्हापूर : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासह पोलीस दलाची कार्यक्षमता आणि सज्जता वाढविण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला चालना देणारा वाहन अर्पण सोहळा आणि ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचा’ लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाची कार्यक्षमता आणि आधुनिक सुविधा महत्त्वाच्या आहेत. याच उद्देशाने पोलीस दलाच्या ताफ्यात आधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला. या वाहनांमुळे पोलिसांना घटनास्थळी जलद पोहोचणे शक्य होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्याचा कालावधी कमी होण्यास मदत होणार आहे.
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला तसेच क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले शहीद अशोक कामटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य बास्केटबॉल मैदान उभारण्यात आले आहे. हे मैदान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा सराव आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्याला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अशोकराव माने, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नवीन वाहनांचे पूजन करण्यात आले तसेच बास्केटबॉल मैदानाचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासोबतच कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व क्रीडा सुविधांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम ठरला.











