‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’चा संदेश; १५० ते २०० नागरिकांसह पोलीस, युवक आणि विविध संघटनांचा सहभाग
हिंगणघाट (प्रतिनिधी ) : भारताचे लोहपुरुष, देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या वतीने ‘एकता दौड’ आणि ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात हिंगणघाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत, रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय डेहणे, डॉ. अशोक मुखी, उदय शेंडे, जय जवान अकॅडमीचे संस्थापक सतीश तिमांडे, गृह रक्षक दलाचे अधिकारी कैलास रोकडे आणि माजी सैनिक संघटनेचे पुंडलिक बकाने यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली.
या एकता दौडमध्ये शहरातील सुमारे १५० ते २०० नागरिक, युवक, पोलीस अधिकारी व अंमलदार, गृह रक्षक दलाचे जवान, रोटरी क्लब हिंगणघाट, जय जवान अकॅडमी तसेच माजी सैनिक संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमाच्या माध्यमातून देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याचा संदेश देण्यात आला. तसेच डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रवीण बोधाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.











