व्ही. राधा समितीच्या शिफारशींना शासनाची मंजुरी; स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळीत आनंदाची बातमी
श्रीगोंदा :
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐन दिवाळीत मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. व्ही. राधा समितीच्या शिफारशींना राज्य सरकारने मंजुरी दिल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क (Group C) भरतीतील पदसंख्या वाढून १६ हजार ७१७ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत भाजपचे आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
विद्यार्थ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितले की, राज्यातील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून पदसंख्या वाढविण्याची तसेच वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून शासनाने व्ही. राधा समितीची स्थापना केली होती. समितीने सादर केलेल्या शिफारशींचा सकारात्मक विचार करून शासनाने त्यांना मंजुरी दिली आहे.
सुरुवातीला सुमारे ५ हजार पदांची अपेक्षा असताना आता ही पदसंख्या १६ हजार ७१७ पर्यंत जाणार असल्याने मोठ्या संख्येने उमेदवारांना स्पर्धा परीक्षेत संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना दिलासा मिळणार असल्याचे पाचपुते यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय : पाचपुते
ऐन दिवाळीच्या सणात हा निर्णय झाल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि न्याय्य मागण्यांचा हा विजय असल्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी म्हटले. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
यावेळी आमदार विक्रम पाचपुते यांनी राज्यातील सर्व विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छाही दिल्या.










