४५ तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू; ४,००० हून अधिक मालवाहू ट्रक महामार्गावर अडकले, कारखानदारांकडून ठोस दर जाहीर न झाल्याने आंदोलक ठाम
सातारा : प्रतिनिधी
ऊसदरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साताऱ्यात सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाला ४५ तासांहून अधिक काळ उलटला असून, उसाला प्रतिटन ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपये दर मिळावा, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनामुळे सातारा-पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून, साताऱ्यापासून थेट कर्नाटकच्या हद्दीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या वाहतूक कोंडीत सुमारे ४ हजारांहून अधिक मालवाहू ट्रक आणि कंटेनर अडकून पडले आहेत. अनेक तास महामार्गावर थांबावे लागत असल्याने ट्रकचालकांना अन्न आणि पाण्याविना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाही. कारखानदारांच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष ऊसदराचा आकडा जाहीर न केल्याने शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
केवळ तोंडी आश्वासने नकोत, तर एफआरपीपेक्षा (FRP) अधिक दर देण्याची लेखी घोषणा करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. प्रतिटन ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपये दराबाबत ठोस लेखी निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.









