दोन महिन्यांपासून घराबाहेर असलेल्या कांडलकर कुटुंबाला दिलासा; दिवाळी हक्काच्या घरात साजरी करण्याची आशा
तिवसा :
दि. ५ : कर्जाचे हप्ते थकल्याचे कारण देत एका सामान्य शेतमजूर कुटुंबाला घराबाहेर काढून त्यांच्या घराला सील लावण्यात आल्याचा प्रकार तिवसा शहरातील आनंदवाडी परिसरात समोर आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून घराबाहेर राहणाऱ्या कांडलकर कुटुंबाला शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी दिलासा दिला. नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते अनिल थुल यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सीलबंद घराचे कुलूप तोडून कुटुंबाला पुन्हा घरात प्रवेश मिळवून दिला.
तिवसा शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये राहणारे गजानन श्रावणजी कांडलकर यांच्या घराला जना स्मॉल फायनान्स बँकेकडून कर्जाच्या हप्त्यांची थकबाकी असल्याचे कारण देत सील लावण्यात आले होते. अचानक घराबाहेर पडण्याची वेळ आल्याने कांडलकर कुटुंबावर मोठे संकट ओढवले. गेल्या दोन महिन्यांपासून हे कुटुंब स्वतःच्या घरापासून दूर राहत असून, निवाऱ्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागत होते.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अनिल थुल यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी आनंदवाडी परिसरात धाव घेतली. त्यांनी सीलबंद घराचे कुलूप तोडून कांडलकर कुटुंबाला घरात प्रवेश मिळवून दिला. दोन महिन्यांपासून घराबाहेर राहणाऱ्या कुटुंबासाठी ही घटना दिलासादायक ठरली. यामुळे यंदाची दिवाळी निदान आपल्या हक्काच्या घरात साजरी करता येईल, अशी आशा कुटुंबाला निर्माण झाली आहे.
यावेळी नगरसेवक आशिष ढोले, माजी नगरसेवक किशोर सातपुते, गौतम भोगे, चरणसिंग बावरी, अभिषेक गौरखेडे, श्रीकांत मेहेकरे, बंडू भालचक्र, प्रज्वल गुल्हाने, तुषार पाटील, शिवा शापामोहन, प्रफुल मकेश्वर, किशोर पंडित, अवधूत ठणुकले, मारोतराव पंधरे, प्रणय वाघमारे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









