आमदार आशुतोष काळे यांच्यासह कामगारांच्या तांड्यावर भेट; आनंदाचा शिधा वाटप, जलसंधारणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे आश्वासन
कोळपेवाडी : प्रतिनिधी
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांनी आमदार आशुतोष काळे यांच्यासमवेत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड कामगार बांधवांची त्यांच्या तांड्यावर जाऊन भेट घेतली. दिवाळीच्या निमित्ताने कामगारांसोबत आनंदाचे क्षण साजरे करत मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कामगारांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला.
दिवाळीचा सण आपल्या समाजातील ऊसतोड कामगार बांधवांसोबत साजरा करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी स्वतः कारखाना परिसरात येऊन त्यांची भेट घेतली. यावेळी कामगारांशी संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, दिवाळीच्या सणात ऊसतोड कामगार बांधवांसोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी स्वतः उपस्थिती लावली. शासनामध्ये ऊसतोड कामगारांप्रती आपुलकी आणि संवेदनशीलता जपणारे मंत्री आहेत, याचा मनस्वी अभिमान वाटतो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, कोपरगाव मतदारसंघातील जलसंधारणाच्या कामांसाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. सादर करण्यात येणाऱ्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिले.
या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनाजी कुदळे, संचालक सूर्यभान कोळपे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, ज्ञानेश्वर हाळनोर, सुनील कोळपे, अंबादास धनगर, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी. बी. सय्यद, असिस्टंट सेक्रेटरी संदीप शिरसाट यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी आणि ऊसतोड कामगार बांधव उपस्थित होते.










