दोंडाईचा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा उत्साहात; “कविता वाचायची नाही, तर अनुभवायची असते,” कवी प्रा. भांडारकर यांचे मनोगत
दोंडाईचा : प्रतिनिधी
साहित्य क्षेत्रात एका नव्या साहित्यकृतीची भर पडली असून, प्रा. प्रकाश भांडारकर यांच्या बहुप्रतीक्षित ‘प्रकाशवाट’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा दोंडाईचा येथील सौरभ मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. आदरणीय नानासाहेब हेमंतरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यबाहुल्यामुळे नामदार जयकुमार रावल यांना या सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमळनेर येथील कस्तुरी प्रकाशनचे संचालक आणि नामवंत लेखक गोकुळ बागुल उपस्थित होते. विशेष म्हणजे, ‘प्रकाशवाट’ या काव्यसंग्रहाची प्रस्तावनाही त्यांनीच लिहिली आहे. नामवंत लेखिका लतिका चौधरी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
‘कविता वाचायची नाही, तर अनुभवायची असते’
कवी प्रा. प्रकाश भांडारकर यांनी आपल्या मनोगतातून स्वतःच्या भावविश्वातील अनुभव आणि कवितेमागील भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “कविता वाचायची नाही, तर अनुभवायची असते. उचंबळून येणाऱ्या आणि ऊतू जाणाऱ्या भावनांना शब्दांमध्ये गुंफणे म्हणजे कविता.”
प्रा. भांडारकर यांच्या कवितांमध्ये निसर्गसौंदर्य, रम्यता, वास्तववादी संकल्पना तसेच मंबाजी आणि मंथरा यांसारख्या प्रतीकांचा प्रभावी वापर दिसून येतो. त्यांच्या कवितांतील आशय आणि भावविश्व श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणारे असल्याचे उपस्थितांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
विविध संस्थांकडून कवीचा सन्मान
प्रकाशन सोहळ्यात उपस्थित श्रोत्यांनी प्रा. प्रकाश भांडारकर यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. रिटायर्ड टीचर्स क्लबच्या सदस्यांनी समूहाने त्यांचा सन्मान केला. तसेच दोंडाईचा येथील शिंपी समाजाच्या मित्रमंडळींनी पांडुरंग शिंपी आणि सतीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कवीचा सत्कार केला. महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. शीतल कोंटुरवार यांच्यासह महिला भगिनींनीही त्यांचा सन्मान केला.
या कार्यक्रमाला नानासाहेब देशमुख, गोकुळ बागुल, लतिका चौधरी, प्राचार्य प्रकाश लोहार आणि प्राचार्य कैलास कापडणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संयोजन प्रा. पी. जी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रवीण पाटील यांनी केले, तर सतीश पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. साहित्यप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.










