अजितदादा पवार गटाची कारखान्यावर एकहाती सत्ता; २१ पैकी २१ जागांवर विजयानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील बहुचर्चित श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या चेअरमनपदी राजवर्धन शिवाजीराव शिंदे यांची, तर व्हाईस चेअरमनपदी संग्राम सोरटे यांची निवड करण्यात आली. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज, दि. ७ रोजी निवड प्रक्रिया पार पडली.
कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अजितदादा पवार गटाने २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवून कारखान्यावर एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. त्यानंतर आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदांच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. या निवडीत राजवर्धन शिंदे आणि संग्राम सोरटे यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झाली.
या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून दिग्विजय आहेर यांनी काम पाहिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार, पुणे जिल्हाध्यक्ष कोरेकर, संभाजी होळकर, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप बांदल, नवनिर्वाचित संचालक मंडळ, कारखान्याचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
राजवर्धन शिंदे आणि संग्राम सोरटे यांच्या निवडीबद्दल समर्थक, सभासद आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची आगामी वाटचाल यशस्वी होईल आणि सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.











