पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग येथे आयोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतला दिवाळी फराळाचा आनंद
अलिबाग : प्रतिनिधी
दीपावली सणानिमित्त रायगड जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, अलिबाग येथे उत्साहात पार पडला. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या सौजन्याने आयोजित या उपक्रमाला वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपावलीच्या निमित्ताने पोलीस बांधवांमध्ये आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने या फराळ वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे दीपावली फराळाचा आनंद घेत सणाच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली.
आचल दलाल आणि अभिजीत शिवथरे यांची रायगड जिल्ह्यात नियुक्ती झाल्यापासून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक, उत्साहवर्धक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासह त्यांच्या कामकाजात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
याशिवाय वाहतूक व्यवस्थापन, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा आणि महिला अत्याचार प्रतिबंध यांसारख्या विषयांवरही विशेष उपक्रम राबविण्यात आले आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून, रात्रीच्या वेळी महिलांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोलिसांची मदत मिळावी, यासाठी मोबाईलद्वारे संपर्क साधून मदत मागविण्याची सुविधाही सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दीपावली फराळ वाटपाच्या या उपक्रमामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि स्नेहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाबद्दल रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे आणि संपूर्ण पोलीस दलाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी रायगड जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.









