देवळाली-लोखंडवाडी येथील सोनी पठार डोंगर परिसरातील घटना; वाघ की बिबट्या याबाबत संभ्रम, वनविभागाकडून तपास सुरू
आष्टी (बीड) : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील देवळाली-लोखंडवाडी येथील सोनी पठार डोंगर परिसरात शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर) सकाळी वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. देवीदास उर्फ पिंटू माणिक टकले (वय अंदाजे ३८ ते ४० वर्षे, रा. टकले वस्ती, देवळाली-लोखंडवाडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुलगा गवताची मोळी आणण्यासाठी डोंगरावर गेला अन् घटनेचा उलगडा
मिळालेल्या माहितीनुसार, देवीदास टकले यांनी डोंगर परिसरात कापून ठेवलेली गवताची मोळी आणण्यासाठी त्यांचा मुलगा सकाळी डोंगरावर गेला होता. यावेळी त्याला रस्त्यावर रक्ताचे डाग तसेच जमिनीवर काहीतरी ओढत नेल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे संशय आल्याने त्याने तातडीने वस्तीवर धाव घेत ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ही घटना उघडकीस आली.
दाट झुडपांच्या दिशेने फरफटत नेल्याचा अंदाज
प्राथमिक माहितीनुसार, हल्ल्यानंतर वन्यप्राण्याने देवीदास यांना पकडून
दाट काटेरी झुडपांच्या दिशेने ओढत नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही स्थानिकांच्या माहितीनुसार, त्यांना सुमारे १०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आले असावे. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
वाघ की बिबट्या? परिसरात चर्चेला उधाण
या परिसरात यापूर्वी बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, टिपेश्वर अभयारण्यातून आलेला ‘रामलिंग’ नावाचा पट्टेदार नर वाघ आष्टी वनपरिक्षेत्रातील भुरेवाडी शिवारात ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सोनी पठार परिसरातील हल्ला वाघाने केला की बिबट्याने, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, हल्लेखोर वन्यप्राणी कोणता होता, याबाबत वनविभागाच्या अधिकृत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.
वनविभागाकडून घटनास्थळी पाहणी व तपास
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून हल्लेखोर वन्यप्राण्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही केली जात आहे.
वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
या घटनेनंतर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतीची कामे, जनावरांसाठी चारा आणणे तसेच डोंगर परिसरात जाणे धोकादायक बनल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वनविभागाने तातडीने हल्लेखोर वन्यप्राण्याचा शोध घ्यावा, परिसरात गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे









