महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अनोखा उपक्रम; दहा हजारांहून अधिक पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी खुला
शहादा, दि. १० : फटाक्यांच्या आतषबाजीऐवजी पुस्तकांच्या सहवासातून ज्ञानाचा प्रकाश पसरविणारी आणि वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणारी आगळीवेगळी दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहादा शाखेच्या वतीने राबविण्यात येत आहे. ‘दिवाळी बुक फेस्टिव्हल’ या उपक्रमाचे यंदा चौदावे वर्ष असून, या ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दिवाळीचा सण पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या फटाक्यांऐवजी ग्रंथवाचन आणि पुस्तक खरेदीच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश पसरविणारा ठरावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. गेल्या चौदा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम शहादा परिसरात वाचनसंस्कृती रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
या ग्रंथप्रदर्शनात महाराष्ट्रातील अनेक नामांकित प्रकाशकांची दहा हजारांहून अधिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गाजलेल्या कादंबऱ्या, कथा, कविता, नाटके, चरित्रे, आत्मचरित्रे, ललित साहित्य, पर्यटन, करिअर, व्यक्तिमत्त्व विकास, वैचारिक साहित्य, संदर्भग्रंथ, आरोग्य, योगासने आणि व्यायाम अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समृद्ध संग्रह वाचकांसाठी खुला करण्यात आला आहे.
महिलांसाठीही विशेष पुस्तकसंग्रह
महिलांसाठी या प्रदर्शनात विशेष पुस्तकसंग्रह उपलब्ध करून देण्यात आला आहे. शिवणकाम, आरोग्य, सौंदर्यसाधना, योग, फिटनेस, करिअर आणि पाककला यांसारख्या विषयांवरील पुस्तकांसोबतच संघर्षातून यश मिळविणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या महिलांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख करून देणारी पुस्तकेही येथे उपलब्ध आहेत.
‘पुस्तके असतात संस्कृतीची मस्तके! पुस्तके असतात आपले गुरू आणि मित्र!’ या विचारातून वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम आहे. ‘वाचाल तर वाचाल!’ हा संदेश समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविणे आणि नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, हा या ग्रंथप्रदर्शनाचा प्रमुख हेतू आहे.
३० नोव्हेंबरपर्यंत ग्रंथप्रदर्शन सुरू
दि. १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण महिनाभर हे ग्रंथदालन वाचकांसाठी खुले राहणार आहे. शहादा येथील स्टेट बँकेजवळ, कृषी भवनाशेजारी या भव्य पुस्तक दालनाची उभारणी करण्यात आली आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, साहित्यप्रेमी आणि सर्व वाचनप्रेमींनी या ज्ञानपर्वणीचा लाभ घेण्यासाठी ग्रंथप्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शहादा शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.









