ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती; वाहकासह चार ते पाच प्रवासी उपचारासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात दाखल
तिवसा, : शिरजगाव मोझरी येथून अमरावतीकडे जाणाऱ्या एसटी बसला धोत्रा ते सालोरा गावादरम्यान अपघात झाला. अरुंद रस्त्यावरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन उलटली. अपघाताच्या वेळी बसमध्ये चालक आणि वाहकासह सुमारे २२ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरजगाव मोझरी येथून दुपारी १.३० वाजता एसटी बस अमरावतीच्या दिशेने रवाना झाली होती. धोत्रा गावापासून काही अंतरावर असताना एका वळणावर रस्ता अरुंद असल्याने तसेच चालकाच्या सांगण्यानुसार बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी बस थेट रस्त्यालगतच्या नाल्यात जाऊन उलटली.
अपघातानंतर बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. यावेळी वाहकासह चार ते पाच प्रवाशांना दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अमरावती विभागीय नियंत्रकांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
या अपघातामुळे एसटी बसच्या तांत्रिक स्थितीचा आणि अरुंद रस्त्यावरील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.











