शेतकऱ्यांची एकजूट; विश्वासात घेतल्याशिवाय जमिनींची मोजणी करू नये, शेतकऱ्यांची ठाम भूमिका
कळमनुरी : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित मार्गासाठी गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी कळमनुरी तालुक्यातील काळ्याची वाडी येथे मोजणी करण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी तसेच वन विभागाचे अधिकारी दाखल झाले होते. मात्र, या मोजणीला गावातील शेतकऱ्यांनी एकजुटीने तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे परिसरात शेतकऱ्यांच्या नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कळमनुरी तालुका सध्या दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीचा सामना करत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेती, पाणी आणि उदरनिर्वाहाचे प्रश्न गंभीर बनले असताना शासनाने सर्वप्रथम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
एकीकडे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना दुसरीकडे शक्तिपीठ महामार्गासारख्या मोठ्या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. या महामार्गाची सध्याच्या परिस्थितीत नेमकी गरज काय? शेतकऱ्यांच्या जमिनी आणि त्यांच्या कष्टाने उभे राहिलेले संसार यांचा विचार कोण करणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
विकासाला विरोध नाही; मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देऊन होणारा विकास मान्य नाही, अशी ठाम भूमिका काळ्याची वाडी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शासनाने प्रथम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय त्यांच्या जमिनींबाबत कोणताही निर्णय लादू नये, अशी भूमिका घेत काळ्याची वाडी येथील शेतकऱ्यांनी मोजणीला विरोध दर्शविला.
शेतकरी एकजुटीचा विजय असो! शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेती वाचली तरच देश टिकेल!
स्थळ : काळ्याची वाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली.









