हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ; ‘जय बाबारी’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय
मेहकर | प्रतिनिधी
दिवाळीच्या निमित्ताने मेहकर शहरातील श्री रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि रामदेवबाबा सेवा समितीच्या वतीने अन्नकूट महाप्रसाद सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमात हजारो भाविकांनी सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या निमित्ताने अन्नकूट प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांसह श्री रामदेवबाबांची महाआरती करण्यात आली. ‘जय बाबारी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर, नगराध्यक्ष किशोर गारोळे आणि नगरसेवक अमर घोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री रामदेवबाबा सेवा समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. धार्मिक उत्साह आणि भाविकांच्या उपस्थितीत अन्नकूट महाप्रसाद सोहळा उत्साहात संपन्न झाला.










