समाजहिताचे विविध ठराव मंजूर; गुणवंत विद्यार्थी, युवक-युवती आणि समाजसेवकांचा गौरव
शहादा | दि. १५ नोव्हेंबर
समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेत समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले. या अधिवेशनात समाजाच्या प्रगतीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, समाजहिताचे ठराव मंजूर करण्यात आले, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
अधिवेशनाची सुरुवात माँ अन्नपूर्णा आणि स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. समाजाच्या महिला आघाडीच्या दिवंगत अध्यक्षा कै. कमलताई पाटील यांच्यासह समाजातील दिवंगत बांधव आणि देशपातळीवरील थोर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील, सौ. जयश्रीबेन उर्फ कंचनबेन पाटील, उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील, मंगलाबेन चौधरी, विमलबेन चौधरी, डॉ. सविता पाटील, रामचंद्रभाई पाटील, उपाध्यक्ष सुनीलभाई पटेल, मोहनभाई चौधरी, जगदीशभाई पटेल, रविंद्रभाई गुजर, सुनीलभाई पाटील, डॉ. सतीशभाई चौधरी, सुभाषभाई पटेल, शितलभाई (मुन्नाभाई) पटेल, डॉ. लतेशभाई चौधरी, राकेशभाई पाटील, मोहनभाई पटेल, गोविंदभाई पाटील, राजारामभाई पाटील, ॲड. प्रभाकर चौधरी, डॉ. वसंतभाई चौधरी, दीपकनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजाचे जनरल सेक्रेटरी सुनीलभाई पाटील यांनी मागील सभेचे इतिवृत्त आणि जमा-खर्चाचा तपशील सादर केला. त्यानंतर विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. समाजाच्या कार्यक्रमांवरील खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा मुद्दा यावेळी विशेषत्वाने मांडण्यात आला. किशोर पटेल (शहादा), डॉ. सविता पाटील (नंदुरबार), गिरिशभाई पाटील, उत्तमभाई पाटील (धुरखेडा), सचिनभाई पाटील व जगदीशभाई पाटील (मामा मोहिदा), डॉ. लतेशभाई चौधरी (बारडोली), सौ. धनश्री पाटील (पुणे), महेंद्रभाई पाटील (तळवे), प्रा. ईश्वर पाटील (शहादा), डॉ. वसंतभाई चौधरी (करजकुपा), दीपकनाथ पाटील (नाशिक), निलेशभाई पाटील (मलोणी), डॉ. प्रफुल्ल पाटील (शिवपूर-औरंगपूर) आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
बालकलाकार हित याने ‘गुर्जरी गाथा’ या लोकगीताचे सुरेख सादरीकरण केले. त्याला उपस्थित समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ. जयश्रीताई (कंचनताई) दीपकभाई पाटील यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
शिक्षण क्षेत्रात गुजर बोलीभाषेचा समावेश व्हावा, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी विनंती डॉ. सविता पाटील यांनी केली. तसेच राजस्थानमधील किशनगढ येथील समाजाचे भाट दादा लक्ष्मणभाई बारोट हे २१ नोव्हेंबरपासून प्रकाशा येथील सद्गुरू धर्मशाळेत उपस्थित राहणार असून, समाजबांधवांनी आपल्या परिवाराची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. समाजाचे १८ नियम व ठराव सर्व समाजबांधवांनी पाळावेत, असेही ठरविण्यात आले.
शिक्षण, क्रीडा, संशोधन, साहित्य, कला आणि प्रशासकीय सेवांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजातील गुणवंत युवक-युवतींचा अध्यक्ष दीपकभाई पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. जयश्रीताई (कंचनताई) दीपकभाई पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तींमध्ये कु. सेजल जितेंद्र पाटील (पुसनद, सध्या इंदूर) हिची मध्यप्रदेश सिनियर नेटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल, कु. दक्ष सुरेश पाटील (करजकुपा) याने इंग्रजी प्री-इंटरमिजिएट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल, कु. अनुज उज्ज्वल पाटील (पळासवाडा, सध्या अंकलेश्वर) याने ‘रेलिक्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकाचे लेखन केल्याबद्दल, तर कु. धनवी नीरज पाटील (प्रकाशा, सध्या सुरत) हिची गुजरात बास्केटबॉल संघात निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
डॉ. महेशकुमार प्रकाश पाटील (विद्याविहार, सध्या बडोदा) यांचा २०२५-२६ मध्ये स्टॅनफोर्ड-एल्सेव्हियर यांच्या जगातील टॉप २ टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवल्याबद्दल, डॉ. काजल शरद पाटील (टाकरखेडा, सध्या मलोणी) हिने मास्टर ऑफ फिजिओथेरपी परीक्षेत विद्यापीठ गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावल्याबद्दल, तसेच कु. तन्वी महेंद्र पटेल (विद्याविहार, सध्या इंदूर) हिने २०२५-२६ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
कु. मयूर सखाराम पाटील (बामखेडा) यांची एमपीएससी महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेद्वारे राजपत्रित कृषी अधिकारी वर्ग-२ पदी निवड झाल्याबद्दल, कु. श्रेयस मनोजकुमार पाटील (कळमसर मोहिदा, सध्या अंकलेश्वर) यांना अमेरिकेतील डेंटन येथील टेक्सास विद्यापीठातून मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल, तर कु. ध्रुवील अनिल पाटील (पिंगाणे, सध्या शिरपूर) याने नीट परीक्षेत ६६० गुण मिळवून एम्स रायपूर येथे एमबीबीएस प्रवेश मिळवल्याबद्दल गौरविण्यात आले.
कु. स्वराज कमलेश पाटील (लांबोळा, सध्या पुणे) याला लंडन येथे झालेल्या भारत महोत्सवात ‘भारत कला साहित्य सन्मान’ पुरस्कार मिळाल्याबद्दल, कु. गुरुराज योगेश्वर पाटील (रायखेड, सध्या नाशिक) याने जेईई मेन्समध्ये ४१८ आणि जेईई ॲडव्हान्समध्ये ८१४ रँक मिळवून आयआयटी कानपूर येथे बी.टेक. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवल्याबद्दल, तसेच कु. हितांशी किशोर पटेल (पिसावर, सध्या अहमदाबाद) हिची १७ ते १९ वयोगटातील राष्ट्रीय फुटबॉल संघात निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कु. प्रनिका प्रफुल्ल पाटील (शिवपूर-औरंगपूर) हिच्या अबॅकस क्षेत्रातील कामगिरीची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याबद्दल, तसेच ती उत्कृष्ट बुद्धिबळपटू असल्याबद्दल गौरव करण्यात आला. कु. हित जयभाई पटेल (अहमदाबाद) याने ‘गुर्जरी गाथा’ या लोकगीताचे सादरीकरण केल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.
याशिवाय मोहनभाई पटेल (भरूच), डॉ. लतेश चौधरी (बारडोली), समाजबांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करणारे लहान शहादा येथील राजेंद्र सुदाम पाटील आणि मंडपाची व्यवस्था करणारे तिखोरा येथील पद्मावती मंडपाचे संचालक श्रीराम छगन पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सामूहिक सत्कारामध्ये डॉ. भरत नगिन पाटील (कवठळ, सध्या शहादा) यांची वरिष्ठ महाविद्यालय, सोरापाडा, अक्कलकुवा येथे उपप्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि कु. गितराज नितीन पाटील (प्रकाशा) याने जेईई मेन्स बी.आर्किटेक्चर पेपर २-अ मध्ये १६२९ रँक, तर बी.प्लॅनिंग पेपर २-ब मध्ये ८१२ रँक मिळवल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच शेतकरी कुटुंबातील मुलांशी विवाह करणाऱ्या समाजातील मुलींच्या कुटुंबीयांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.
समाजसंघटन, बोलीभाषा आणि शेतीप्रधान संस्कृती जपण्याचे आवाहन
अध्यक्षीय भाषणात दीपकभाई पाटील यांनी समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. समाजकारण करताना राजकारणाला स्थान देत नसल्याचे सांगत, समाजातील शेवटच्या घटकाच्या सामाजिक उत्थानासाठी तयार करण्यात आलेले नियम सर्वांनी स्वीकारावेत, असे त्यांनी नमूद केले.
आपली गुजर बोलीभाषा विसरता कामा नये; तिचा दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. गुजर समाज हा शेतीप्रधान समाज असल्याने संघटन बळकट करण्यासोबतच शेती करणाऱ्या मुलांना विवाहासाठी प्रोत्साहन द्यावे, असेही ते म्हणाले.
स्व. अण्णासाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन समाजकार्य करण्याची शिकवण दिली. समाजातील तरुण-तरुणींनी आधुनिक युगात विविध क्षेत्रांत प्रगती करावी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
या अधिवेशनात समाजासाठी तसेच सद्गुरू धर्मशाळेसाठी दानशूर व्यक्तींनी देणग्या जाहीर केल्या. अनिल अशोक पाटील, राजाराम नथ्थू पाटील, जगन्नाथ पाटील, दिलीप ज्ञानदेव पाटील, विनोद चौधरी, राजाराम दगडू पाटील, प्रवीण पाटील, रमाकांत (लड्डूभाई) पाटील, उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई पाटील, मंगलाबेन चौधरी, विमलबेन चौधरी, जयप्रकाश पाटील, प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल, भरत पाटील, जयदेव पाटील, कन्हैयालाल भुता पाटील, विलास पाटील, गणेश पाटील, यशवंत पाटील आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
अधिवेशनासाठी आलेल्या सर्व समाजबांधवांच्या भोजनाची व्यवस्था लहान शहादा येथील राजेंद्र सुदाम पाटील यांनी केली होती. पुढील वर्षीच्या अधिवेशनातील भोजनाची व्यवस्था शहादा येथील अंकुर अंबालाल पाटील यांच्यातर्फे करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अधिवेशनाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन समाजाचे जनरल सेक्रेटरी सुनीलभाई पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाली.










