अमृत महोत्सवी प्रेरणा दिन उत्साहात साजरा; राज्यभरातील आंबेडकरी अनुयायांची मोठी उपस्थिती
मनमाड | प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते १९४५ मध्ये भूमिपूजन आणि १९५१ मध्ये उद्घाटन झालेल्या मनमाड येथील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह (प्रेरणाभूमी) येथे अमृत महोत्सवी प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. वसतिगृहाच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासानिमित्त आयोजित या सोहळ्याला राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव यशवंत आंबेडकर, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे, मनमाडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश पाटील, नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळाचे कॅप्टन कुणाल गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, नगरसेवक संतोष भाऊ अहिरे आणि मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक मंडळ आणि मनमाड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वसतिगृहाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक प्रेरणाभूमीशी जोडलेल्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी या सोहळ्यात सहभाग नोंदविला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विचारांचा वारसा जपणाऱ्या या वसतिगृहाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यामुळे मनमाडमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.










