ऊस, ठिबक सिंचन संच, शेततळ्याचे प्लास्टिक आणि फळझाडे जळून खाक; शेतकरी आर्थिक संकटात
करमाळा | प्रतिनिधी
नेरले (ता. करमाळा) येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील लोखंडे यांच्या शेतातील ऊस, शेतीसाठी लागणारे साहित्य, फळझाडे आणि इतर साहित्य आगीत जळून खाक झाले.
लोखंडे यांच्या गट क्रमांक १६ मधील शेताजवळ असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत शेतातील ऊस, उसासाठी टाकलेला ठिबक सिंचन संच, पाईप, भाजीपाला लागवडीसाठी उभारलेले बांबू, एक एकर क्षेत्रातील शेततळ्याचे प्लास्टिक कागद तसेच कृषी विभागामार्फत बांधावर लावण्यात आलेली आंब्याची झाडे जळून खाक झाली. याशिवाय अन्य शेती साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच जेऊर येथील महावितरणचे अभियंता साळुंखे, वायरमन तानाजी भंडारे आणि कोतवाल शिवाजी काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करण्याचे आश्वासन दिले.
आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना या आगीच्या घटनेमुळे सुनील लोखंडे यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. शेतीसाठी केलेला खर्च आणि उभे पीक डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेचा तातडीने पंचनामा करून नुकसानीचा योग्य मोबदला व शासकीय मदत मिळावी, तसेच महावितरणनेही या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानभरपाईबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.










