५ ते १३ नोव्हेंबरदरम्यान पाटबंधारे विभागाची धडक मोहीम; विरोध आणि घेरावानंतरही कारवाई सुरूच
श्रीगोंदा | प्रतिनिधी
कुकडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यानंतर पाणीचोरी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. ५ ते १३ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल ५०० अनधिकृत पाईप काढून टाकण्यात आले असून, पाणीचोरीप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुकडी डाव्या कालव्यात ५ नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता श्रीगोंदा तालुक्यात पोहोचले. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता किलोमीटर ११० येथे पूर्ण गेजने पाणी पोहोचले. तसेच १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता किलोमीटर १६५ येथेही पूर्ण गेजने पाणी पोहोचले.
कालव्यात पाणी सोडण्यापूर्वीच प्रशासनाने कालव्यावरील अनधिकृत पाईपमध्ये दगड टाकून तसेच पेट्रोलच्या साहाय्याने जाळून ते निकामी केले होते. त्यानंतर ५ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत कालव्यावरील अनधिकृत पाईप आणि विद्युत मोटारी काढून टाकण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. या कारवाईत सुमारे ५०० पाईप कापून काढण्यात आले, तर ११ जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले.
१४ नोव्हेंबर रोजी भानगाव हद्दीत अनधिकृत पाईप काढण्याचे काम सुरू असताना स्थानिक जमावाने पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेराव घातला. मात्र, या विरोधाला न जुमानता कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरू ठेवत अनधिकृत पाईप काढून टाकले.
कालव्यालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही चोरी पूर्णपणे रोखण्यासाठी कालव्यालगतच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करावा, अशी विनंती महावितरणच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीगोंदा सिंचन विभागाचे उपअभियंता बोरसे यांनी दिली.










