२१ नोव्हेंबरला मुख्य कार्तिकी एकादशी; १२ ते १३ लाख भाविक येण्याचा प्रशासनाचा अंदाज
पंढरपूर | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या कार्तिकी वारीला सुरुवात झाली असून, लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंढरपूर नगरी सज्ज होत आहे. येत्या २१ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने १४ नोव्हेंबरपासून २४ तास दर्शनाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार देवाच्या विश्रांतीसाठी असलेला चांदीचा पलंग विधिवत पूजा करून काढण्यात आला आहे. तसेच विठ्ठलाच्या पाठीशी आणि रुक्मिणी मातेच्या पाठीशी मऊ मखमली कापसाचा लोड ठेवण्यात आला आहे. या कालावधीत मुखदर्शन २४ तास सुरू राहणार असून, चरणस्पर्श दर्शन दररोज २२ तास १५ मिनिटे उपलब्ध राहणार आहे. मात्र, मधल्या काही पूजेच्या वेळेत दर्शन काही काळासाठी बंद राहणार आहे.
यंदाच्या कार्तिकी वारीसाठी सुमारे १२ ते १३ लाख भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, स्वच्छता, पार्किंग, दर्शनरांग व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि वाहतूक नियंत्रण यांसह विविध बाबींचे नियोजन करण्यात येत आहे.
चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता, मंदिर परिसरातील स्वच्छता तसेच भक्तीसागर मैदानावरील सुविधांबाबतही संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पावले पंढरीकडे वळू लागली असून, कार्तिकी वारीच्या सोहळ्याची भक्तांना उत्सुकता लागली आहे.
कार्तिकी वारीचे महत्त्वाचे दिवस
- १४ ते २८ नोव्हेंबर : अहोरात्र दर्शन सुविधा
- २० नोव्हेंबर : स्मार्त एकादशी
- २१ नोव्हेंबर : मुख्य कार्तिकी एकादशी
- २८ नोव्हेंबर : प्रक्षाळ पूजा; अहोरात्र दर्शन व्यवस्थेचा समारोप










